श्री तुळजाभवानी मंदिर इतिहास
श्री स्कंद पुराणात या देवीची अवतार कथा खालीलप्रमाणे दिलेली आढळते. कृत युगात कर्दम ऋषींच्यां मृत्यू नंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पती बरोबर सहगमन करण्याचे ठरविले. परंतु तिला अल्पवयीन मुलगा असल्याने इतर ऋषीमुनींनी तिची समजूत काढल्याने अल्पवयीन मुलासाठी तिने तो बेत रहित केला व मंदाकिनी नदीच्या तटावर ती तपश्चर्या करू लागली. त्या समयी कुकुर नावाच्या दैत्याने तिच्या तपाचा व पतिव्रताचा भंग करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने संकट समयी श्री भगवतीचा धावा केला व श्री भगवतीने अवतार धारण करून त्या दुष्ट दैत्याचा वध केला व अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल (बाला घाट) पर्वतावर अखंड वास्तव केले.
भारतात त्रिगुणात्मक आदिशक्तीची तीन स्थाने
१. महाकाली, कलकत्ता तमोगुणात्मक
२. श्री महालक्ष्मी, कोल्हापूर रजोगुणात्मक
३. महासरस्वती, माहूर सत्वात्मक प्रसिद्ध आहेत.
-
श्री भवानीचे स्थान त्रिगुणात्मक म्हणजेच वरील तिन्ही अंशाचे अधिष्ठान समजले जाते
प्रभूरामचंद्राना वनवासात असताना सीतामाईच्या शोधात श्री भगवतीने दर्शन देऊन सीतामाईचा लवकरच शोध लागेल असा आशीर्वादही दिला होता. - श्री तुळजापूर येथील पापनाश मंदिर तीर्थ हे अत्यंत प्राचीन आणि पौराणिक महत्त्व असलेले पवित्र कुंड आहे. स्कंद पुराणातील उल्लेखाप्रमाणे, या कुंडातील पवित्र जलात स्नान केल्याने मानवाचे सर्व कायिक, वाचिक आणि मानसिक पापे नष्ट होतात, म्हणूनच याला 'पापनाश' असे संबोधले जाते. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेल्या या कुंडातून अखंड पाण्याचा प्रवाह वाहत आहे. पापनाश तीर्थ भाविकांच्या दृष्टीने आध्यात्मिक शांती आणि पावनतेचे केंद्र मानले जाते.

